Ad will apear here
Next
.. आणि संगमेश्वरी बोलीतील विनोदांनी ‘पुलं’ झाले हास्यरसात चिंब!
पुस्तकातल्या ‘पुलं’ची ओळख कितीतरी लहान वयात झाली, तेव्हा पुलं हे फक्त खळखळून हास्य फुलविणारे – विनोदी - साहित्यिक आहेत एवढेच माहीत होते. पुलं गंभीरपणाने बोलू लागले तरी तो विनोदच आहे असं लोकांना वाटायचं, तेव्हाचा तो काळ! स्वत: ‘पुलं’नीच याची खंत बोलून दाखविली तेव्हाही हशाच पिकला होता... थोडक्यात, ‘पुलं’च्या प्रतिभेला लोकांनी, त्यांच्या वाचकांनी आणि चाहत्यांनीही, विनोदी लेखकाच्या चौकटीतच घट्ट कोंबून टाकलं होतं. तिथे त्यांची कदाचित घुसमट होत असल्याने वैचारिक साहित्य प्रसवून त्यांनी या चौकटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला; पण आजही त्यांना त्या चौकटीतून बाहेर पडू दिलं जात नाहीये.

महाराष्ट्राचं हे लाडकं व्यक्तिमत्त्व त्यांच्या गाजलेल्या कथाकथनांमधून दृकश्राव्यपणे घरोघरी पोहोचलं, म्हणून ही चौकट अधिकच घट्ट होत गेली, असं मला वाटतं. त्यांचं सामाजिक भान, समाजाची, विशेषत: मध्यमवर्गीय मराठी मानसाची - भावस्पंदने टिपण्याची त्यांच्या प्रतिभेची संवेदनशीलता समजून घेण्याची आमची कुवत नव्हती हेच खरं!

आज पुलं नावाच्या - विनोदापलीकडच्या विविधरंगी व्यक्तिमत्त्वाच्या - शोभादर्शकातील न जाणवलेली अनेक चित्रे उलगडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. वेगवेगळ्या अंगांनी ‘पुलं’सारखे लेखक समजून घेण्याची समाजाच्या मनाची क्षमता सिद्ध होईल, तेव्हा समाज प्रगल्भतेच्या पायऱ्यांवर आहे हे समजावे. ती सुरुवात आता झाली आहे!

पुस्तकांपलीकडचे पुलं अनुभवण्याची, न्याहाळण्याची अल्प संधी मला देवरुखमुळे मिळाली. ‘पुलं’चे सुहृद कै. अरुण आठल्ये यांच्यामुळे! अरुण आठल्येंशी असलेल्या कौटुंबिक जिव्हाळ्यामुळे ते देवरुखला आठल्येंच्या ‘अजॉय’ बंगल्यावर मुक्कामाला असताना उत्तररात्रीपर्यंत रंगलेली गप्पांची (साधारण १९७३-७४ दरम्यान झालेली) एक बहारदार मैफल अजूनही मला टवटवीतपणे आठवते. विनोद हे ‘पुलं’च्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग असल्याने, ‘पुलं’च्या अवतीभवती विनोदाच्या फुलांची पखरणच असायची आणि अशा कौटुंबिक मैफलींनाही विनोदाचा गंध असायचा. देवरुखच्या त्या मैफलीतही तो गंध दरवळला... हास्याचे धबधबे अुसळले.

पण गंमत म्हणजे, त्या धबधब्यांत स्वत: पुलं निखळपणे न्हाऊन निघाले. कारण, तेव्हा पुलं श्रोते होते आणि विनोदाचे धबधबे, देवरुखच्या स्थानिक कलाकारांच्या कला-नकलांमधून उसळत होते. ‘संगमेश्वरी बोली’ आणि ‘संगमेश्वरी देहबोली’ ही ‘पुलं’च्या संवेदनशील विनोदाची प्रतिकृती आहे, हे सहसा लक्षात येत नाही. या बोलीतील निस्वार्थ विनोदाला कुचेष्टेचा गंध नसतो. कधीकधी करुणेची झालर मात्र जरूर असते. थोडक्यात, ह्या बोलीतून निर्माण होणारा, अस्सल लाल मातीतील विनोद हा ‘पुलं’च्या विनोदासारखाच, समाजमनाचा चेहरा दाखविणारा नितळ आरसा असतो...

जोसेफ नावाचे एक अफाट व्यक्तिमत्त्व तेव्हा देवरुखला होते. उभ्या गावाचा मित्र असलेल्या जोसेफकडे, बोली आणि देहबोलीतून दिसलेल्या, टिपलेल्या विनोदांचा अक्षरश: खजिना होता. जोसेफबरोबर गप्पा मारणे हा त्या काळात अनेकांच्या विरंगुळ्याचा आणि तणावमुक्तीचा सोहळा असायचा. आम्ही अशा असंख्य मैफलींमधून हास्याचे धबधबे उधळले होते.

पुलं गावात आल्याचे कळल्यावर त्या रात्री आम्ही गुपचूप तशा मैफिलीचा घाट घातला आणि गप्पांना सुरुवात झाली. सुरुवातीला ‘पुलं’च्या विनोदांची आणि विचारांचीही फुले अंगावर झेलत आम्ही मैफलीत रमत गेलो आणि बघता बघता जोसेफने मैफलीचा ताबा घेतला. संगमेश्वरी बोलीतून त्याने विनोदाची अशी काही पखरण सुरू केली, की ‘पुलं’सारखा माणूसही हास्यरसात चिंब भिजून गेला. टाळ्या आणि हशाची जुगलबंदी सुरू झाली... पुलं श्रोते आहेत आणि त्यांना ऐकताना इतर श्रोते जसे दंग होऊन जातात तसेच ते स्वत: दंग झाले आहेत, हे पाहताना, साहजिकच संगमेश्वरी बोलीतील विनोद हा ‘पुलं’च्या शैलीच्या तोडीचा ठरल्याच्या भावनेने आम्हा मित्रमंडळींची छाती काकणभर फुलून गेली होती.

त्या एका मैफलीने पुढे संगमेश्वरी बोलीला प्रतिष्ठा मिळवून दिली. वैभव मांगलेला या बोलीतूनच ‘विनोदी अभिनयाचे गांभीर्य’ गवसले, असे माझे मत आहे. आनंदा बोंद्रेने तर संगमेश्वरी बोलीच्या सौंदर्याचा प्रसारच सुरू करण्याचे व्रत घेतले.

आज संगमेश्वरी बोलीला विनोदाच्या व्यासपीठावर मिळालेली जागा हे ‘पुलं’सोबतच्या ‘त्या’ मैफलीचे फळ आहे, असे मला वाटते.

‘पुलं’नी केवळ स्वत:च्या प्रतिभेची पखरण केली असे नाही... त्यांनी आणखी एका अप्रसिद्ध प्रतिभेलाही अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले.

देवरुखशी त्यांचे या मैफलीमुळे वेगळे नाते जडले. कारण, ‘पुलंना हसविणारा’ विनोद देवरुखच्या मातीत जन्मला होता!

- दिनेश गुणे

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZXRCG
Similar Posts
माझा लंगोटीयार!!! .... गण्या त्या वेळी माझा सख्खा मित्र होता. कोकणात कायमचं राहण्यासाठी देवरूखला पहिलं पाऊल ठेवलं, त्या दिवशी पाऊस कोसळत होता. असा पाऊस आमच्या गावाला पडायचाच नाही. म्हणून मला तो आवडला. एस्टी बसस्टँडवर थांबली, तेव्हा तो कोसळत होता. मी गाडीतून उतरलो अन् स्टँडच्या शेडमध्ये धावत शिरलो, तोवर पुरता भिजलो. अंगातली
माझा लंगोटीयार!!! .... गण्या त्या वेळी माझा सख्खा मित्र होता. कोकणात कायमचं राहण्यासाठी देवरूखला पहिलं पाऊल ठेवलं, त्या दिवशी पाऊस कोसळत होता. असा पाऊस आमच्या गावाला पडायचाच नाही. म्हणून मला तो आवडला. एस्टी बसस्टँडवर थांबली, तेव्हा तो कोसळत होता. मी गाडीतून उतरलो अन् स्टँडच्या शेडमध्ये धावत शिरलो, तोवर पुरता भिजलो. अंगातली
डे - वन : मफलर ते मास्क पाच-सहा मैल चालल्यावर पाटलांनी तोंड उघडलं. ‘आणीबाणी लागू झालीय. आपल्यातल्या काही लोकांना पकडणारेत. वॉरंट निघालीयेत. जेलमध्ये सडण्यापेक्षा लपून जाऊ. भूमिगत होऊ आणि काही तरी करू. जेलमध्ये किती दिवस राहावं लागेल, तिथे काय हाल होतील, काहीच कळत नाही. त्यापेक्षा भटकू. कुठे तरी लपून आसरा घेऊ. आपल्या माणसांनी तशी व्यवस्था केलीय’
आठवणीतलं गाव... कोकणातलं... धावतधावत गाडी पकडल्यानंतर गर्दीभरल्या गाडीत स्वतःला कसंबसं कोंबून टाकलं, की पावसाच्या सरीनं भिजलेल्या कपाळावर साचलेले घामाचे तेवढे थेंब रुमालाच्या टोकानं टिपताना गावाकडच्या आठवणींचा चित्रपट उलगडू लागतो...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language